रविवार, ३१ जानेवारी, २०१०

"पपु" च्या नावानं चांग भलं !!

"पपु" च्या नावानं चांग भलं !!

नुकतेच भारत सरकार तर्फे राष्ट्रीय पद्म पुरस्कार जाहीर करण्यात आले. त्यातील पुरस्कार विजेत्यांची नावे पाहिली आणि प्रश्न पडला !!! क्षणभर- भटक्या जमातीतील निराधार मुलांसाठी काम करणारे माननीय "गिरीश प्रभुणे " किंवा "दादा इधाते" जी यांची नावे समोर आली .. त्यांना कसलेच पुरस्कार नाहीत !! पण त्या यादीत सिनेमातील नट, राजकीय पुढारी यांची वर्णी बघून मनात विचार करू लागलो; काय करावे ? कुणीसे म्हटले आहे -काहीच करता येत नसेल तर विनोद करा नि खालील स्फुट लिहून काढले ...

तुम्हाला "पपु " माहितीये ? तुम्ही म्हणाल -- त्यात काय एव्हढं ? "पपु" माझ्या मुलाचे नाव !! .दुसरा म्हणेल "पपु " म्हणजे 'परम पूजनीय' ; तीसरा म्हणेल "पपु " म्हणजे 'पपू कलानी' हो !!!

नाही, नाही, नाही - साफ चूक, अगदी त्रिवार चूक!!! सगळंच तुमच्या ' कलाने' घेता येणार नाही! सध्याच्या काळात "पपु " म्हणजे 'पद्म पुरस्कार' !!! कालच या पुरस्कारांची यादी जाहीर झालीये !!! ती बघून माझा जवळचा मित्र मला म्हटला - 'त्यात तुझे नाव नाही!!!' [खरे म्हणजे- तो स्वताचे नाव तिथे शोधत होता!!!] पण त्या यादीतील काही नावे बघून मला हा "पद्म" पुरस्कार मिळाला नाही याचे मला वाईट वाटले नाही; कारण माझ्या कडे "खाण'' नाही .. तुम्ही म्हणाल कसली ही "खाण'' ? लोहाची, चांदीची की सोन्याची ? त्यातील काही नाही हो - मला सत-गुणांची खाण म्हणायचे आहे !! [आजन्म मराठी चा प्राध्यापक असलेल्या मित्राने मला "खाण'' मधील '' ऐवजी '' का नाही घालत असे सुचवले पण मी तो प्रस्ताव साफ 'एक विरुद्ध एक' अशा बहुमतावर फेटाळला !!! कारण, नुसता "ध" चा "मा" केला तर मराठेशाहीला मोठ्या राजकीय भूकंपाला सामोरे जावे लागले !!! त्याने इतिहासात एक नवा अध्याय लिहिला गेला!!! मला वेगळा 'अध्याय' माझ्या नावावर नको होता !!! तुम्ही म्हणाल - हे 'शिवाजी जन्मावा पण तो शेजारयाकडे' अशी वृत्ती झाली !!! असेल - मी मराठी असण्याचीच तर ती एक खूण आहे !! ]. थोडक्यात - अशा पुरस्कारांना लागणारया सत-गुणांची माझ्याकडे आबाळ होते आहे !!! (‘बाळ, आता पुरे असे आई मागून म्हणते आहे, म्हणून मूळ विषयाकडे वळू या) पुढचे म्हणजे - अजून मी आधीची एक (पहिली) सुद्धा बायको सोडलेली नाही !! [पहिलीची आठवण येताच पाचावर धारण बसते !! मग दुसरीचे तर नावच नको !!! आणि तिसरीचा विचार तर स्वप्नात सुद्धा नको !!!]

तसेच - अजून मी नाजूक " नवे " रेशमी संबंध जोडले नाहीत!!!, अशा 'नाजुका' चे नाव हातावर गोंदून घेतले नाही की जोडीने जाहिरातीही करत नाही !!! आणि सिनेमाची गोष्ट तर दूरच !!! खरे तर मला सिनेमात किंवा नाटकात काम करणे खूप आवडते !! अगदी लहान पणापासून मला नट होण्याची हौस आहे पण निर्माता- दिग्दर्शकांकडे खूप चकरा मारून देखील काही उपेग होईना !! प्रत्येक जण आरसा आणला आहे का असे विचारीत !!! बरेच दिवस मला काही बोध होईना की हे सगळे आरसा का आणायला लावतात ? आरश्याला मुख्य नट म्हणून घेणार आहेत का - की माझ्यासोबत नटी म्हणून आरश्याला घेणार आहेत? की संक्रांतीचे वाण म्हणून वाटायचा आहे ? का नुसताच एक भेट म्हणून हवा आहे ? माझ्या कार्यालयातील एक सहकारी म्हटला त्यांना तुझ्याकडून "बयाणा" म्हणून हवा असेल तो !! शेवटी एका हुशार मित्राला सोबत नेले व त्याने खुलासा केला. त्याचा तो खुलासा ऐकला आणि माझा चेहरा आरश्यात पाहण्या लायक झाला !!!

पण मी निराश झालो नाही . 'विक्रम आणि वेताळ' मधील विक्रमाचे 'विक्रम' मोडत मी प्रयत्न सुरु ठेवले !!! आधुनिक काळात 'सर्जी बुब्का' नंतर स्वताचेच विक्रम मोडणारा माझ्यापेक्षा दुसरा कोणी असेल असे नाही मला वाटत.

एकदा एक संधी आयतीच चालून आली - निवडणुकीचे वारे वाहत होते आणि आमच्या मतदार संघात एक (माजी ) मंत्री महोदय निवडणूक लढवीत होते .. ते प्रत्येकाला मारे आश्वासने देत होते !!! "जो जे वांछील, तो ते लाहो - प्राणिजात" या ज्ञानेश्वर माऊलिन्च्या ओळी मला आठवल्या !!! त्यांचे बरेचसे कार्यकर्ते त्यांना उगाच नाही माउली म्हणत !! ते आमच्या भागात प्रचाराला आले. आमच्या वाड्यातील एका काकूने तक्रार केली की बाजूने जाणाऱ्यां आगगाड्यांचा तिला खूप त्रास होतो. मंत्री म्हटले कसला त्रास ?’ काकू म्हटल्या ‘(आग) गाड्यांच्या धडकेने माझ्या शेळ्या व कोंबड्या मरतात - "त्यात काय एव्हढं ? - तुम्ही मला निवडून द्या मग बघा दुसऱ्याच दिवशी गाडीचे रूळ उखडून फेकतो की नाही" - मंत्री म्हटले !!!

एक सामाजिक कार्यकर्ता म्हटला - 'साहेब - आमच्या वस्तीत एक बोर पाहिजे' - साहेब म्हटले एव्हढंच ? – मान्य !! हे ऐकून मला स्फुरण चढले - मी म्हटले -'साहेब- निवडणुकीत तुमचे काम करतो पण तेव्हडे एखांदया नाटकात काम मिळवून द्या की' - झाले -मतदान झाले, निवडणूक संपली, साहेब निवडून आले व त्यांनी आमची कामे केली -- बोर मागणारया कार्यकर्त्या ला 'बोर' 'चिंच' अशा दोन झाडांची रोपे देवून त्यांनी वचन पूर्ती केली !!! खरे म्हणजे त्याला 'बोर' म्हणजे विंधन विहीर हवी होती !!! कारण त्या वस्तीत पाणी येत नव्हते !! त्यात दुष्काळात तेरावा महिना या प्रमाणे मंत्र्यांनी दोन झाडे पाठविली !!! आत्ता - जिथे प्यायला पाणी नाही तिथे झाडांना कुठून घालणार ? ही व्यथा मंत्र्यांजवळ कुणीतरी बोलून दाखविली !! ते मोठे धोरणी निघाले !! म्हटले - "अरे - तुम्ही एक झाड मागितले तर मी तुम्हाला दोन दिलीत ना ? दुसरे झाड कसले दिले आहे हे ठाऊक आहे का तुम्हाला ?" - "चिंचेचे" - एक कार्यकर्ता म्हणाला !!! "'चिंच' म्हटल्यावर काय होते ?" - "तोंडाला भरपूर पाणी सुटते !" - गर्दीतील एक वाहिनी उत्साहाने बोलल्या !!! झाले - मंत्र्यांनी तोच शब्द पकडला व म्हटले एव्हढे पाणी जर तुम्हा प्रत्येकाच्या तोंडाला येईल तर तुम्हाला कशाला हवी वेगळी विहीर? त्यामुळे उगाच जागा व्यापली जाईल. आणि अपघात काय सांगून होतो होय? तुमचीच लहान मुलं त्यात पडू शकतात !!!” मंत्र्यांचा हा भावनिक खोडा ऐकून सर्वांनी आवंढा गिळला मंत्री साहेब कसे आपले खरे तारणहार आहेत ते त्यांना मनोमन पटले !!

या मंत्री साहेबांनी पुढे माझे सुद्धा काम केले !! त्यांच्या शिफारशीमूळे मी एका नाटकात घेतला गेलो - नटाला चहा-पाणी देण्यासाठी!!! हे म्हणजे- रणजी मध्ये शतकावर शतके ठोकून देखील राष्ट्रीय संघात बारावा खेळाडू म्हणून काम करावे लागण्या सारखे झाले !!! असो.

मंत्री पुराणाकडून आपण परत पद्म पुरस्कारांकडे येवू. पुढे म्हणजे, पुरस्कारासाठी लागणारया सत-कृत्यांमध्ये आणखी एक आवश्यक कृत्य मी केले पाहिजे होते - ते म्हणजे -दुर्मिळ व संरक्षित प्राण्यांची शिकार - ती देखील मी कधी केली नव्हती !!! पाहिजे तर जास्तीत जास्त -- झुरळ, ढेकुण किंवा डास मारण्याचा मी पुरावा देवू शकतो !!! अरेरे - आख्खा जन्म वाया गेला माझा !!! (तुम्ही मला म्हणण्या आधीच मी म्हणून घेतो !!!)

आणि पुढचे म्हणजे ह्या पुरस्कारासाठी पात्र ठरण्यासाठी मी अजून कोट्यावधी रुपयांचा सरकारी कर किंवा विजेचे देयक (ज्याला मराठीत 'बिल' म्हणतात !!!) ही बुडविले नाही !!!

म्हणून पुरस्कार यादीत माझे नाव नाही याचे मला आश्चर्य वाटले नाही !!!

हो - अजून मला हा पुरस्कार मिळाला नाही म्हणून दुसरे कुणी मला पुरस्कार देत असतील तर त्याचा मात्र मी आनंदाने स्वीकार करेन !!!

बोला - "पपु" च्या नावानं चांग भलं !!!

………………

राजेश

गुरुवार, २८ जानेवारी, २०१०

मुंबई मोनोरेल

मुंबई मोनोरेल प्रकल्पाची बातमी वाचली. त्याची चाचणी घेण्यात आली .. मोनोरेल चा डब्बा चित्रात दिसतोय पण त्यावरील अक्षरे इंग्रजी भाषेत आहेत !! मराठीची दखल घेण्यात आलेली नाही ... पुन्हा वेगळी मागणी करावी लागेल का ? तसेच मोनोरेल ला मराठीत काय म्हणायचे ? 'एकपट्टी वाहन' की 'हवेतील गाडी' म्हणायचे ? का आणखी काही म्हणायचे ? तुम्ही सांगा ... आभार राजेश